पुणे: वारजे परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर मुठा नदीच्या कडेने मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रोड) रखडलेले काम पूर्ण झाले आहे. हा नवीन मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला असून, त्यामुळे या भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिंहगड रस्ता वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुठा नदीवरील जुना पूल अरुंद असल्याने या भागात नेहमीच वाहनांची प्रचंड कोंडी होत असे. या कोंडीचा थेट फटका प्रयेजा सिटी, वडगाव पूल, नर्हे, धायरी आणि वडगाव खुर्द परिसराला बसत होता. मात्र, हा नवीन सेवा रस्ता सुरू झाल्यामुळे आता या संपूर्ण मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

यापूर्वी सेवा रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वारजे ते वडगाव पुलादरम्यान सर्व वाहनांना मुख्य महामार्गावरूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागायच्या आणि अवघ्या 2-3 किलोमीटरच्या अंतरासाठी वाहनचालकांचा भरपूर वेळ वाया जात होता. आता पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांचा ताण कमी होऊन वडगाव पुलापर्यंतची वाहतूक वेगाने व सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.

या मार्गाचा सर्वाधिक फायदा धायरी, नर्हे, वडगाव बुद्रुक, नांदेड गाव, खडकवासला, वारजे, माळवाडी, शिवणे आणि उत्तमनगर या भागांतून दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना होणार आहे. त्यांना आता वाहतूक कोंडीत न अडकता जलद प्रवास करता येईल.







