पुणे : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह 11 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने एका मारहाण प्रकरणात मोठा दिलासा देत त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 2023 मध्ये नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यातून कोर्टाने सर्वांना मुक्त केले आहे.

जून 2023 मध्ये मुंबई महानगरपालिकेने वांद्रे येथील ठाकरे गटाचे एक पक्ष कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगून पाडले होते. या कारवाईमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. बीएमसीच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

या मोर्चादरम्यान अनिल परब आणि इतर पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बीएमसी कार्यालयात गेले. त्यावेळी पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही ही कारवाई का केली, असा थेट सवाल कार्यकर्त्यांनी केला. या चर्चेदरम्यान बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यासोबत हुज्जत झाली. कार्यकर्त्यांनी पाटील यांना मारहाण व धमकी दिल्याची तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात झाली.
बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, धमकावणे यांसारख्या गंभीर कलमांखाली अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब व इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी सदानंद परब यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात खटला चालला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पुराव्यांअभावी न्यायालयाने अनिल परब, सदानंद परब आणि इतर 9 जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे ठाकरे गटाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.







