पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शहरातील प्रलंबित विकासकामे, कचरा व्यवस्थापन निविदेतील गोंधळ आणि प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनापेक्षाही अधिक चर्चा रंगली ती पुण्यातील दोन बड्या राजकीय नेत्यांच्या एकत्र येण्याची.

कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या संयुक्त नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. नाना भानगिरे हे सुरुवातीपासून शिवसेनेत असून पक्षफुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दुसरीकडे, रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा प्रवास करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकरांच्या या पुनरागमनामुळे भानगिरे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती.

मात्र असे असतानाही, या आंदोलनाच्या निमित्ताने हे दोन्ही कट्टर विरोधी नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र आले. या दोघांच्या मनोमिलनामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.







