विशाल शिंदे

वेल्हे बुद्रुक: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Rajgad News) सामाजिक (Pune News) योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी मंजूर दोन सौर हायमर दिव्यांचे काम प्रत्यक्षात न करता ठेकेदाराने जिल्हा परिषदेकडून १० लाख रुपयांचा निधी काढल्याचा गंभीर आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद बाळासाहेब देशमाने यांनी केला आहे.
या योजनेतून ग्रामपंचायतीला दोन सौरदिवे मंजूर झाले होते. मात्र हे दिवे बसवलेले नसतानाच काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी खोटे जिओ-टॅग फोटो, बसवलेल्या दिव्यांचे बनावट चित्र तसेच ग्रामसेवकाची खोटी सही जोडून कागदपत्रे सादर केल्याचे बोलले जात आहे. या कागदपत्रांच्या आधारे ठेकेदार जी. के. एजन्सी (भोसरी) यांनी जिल्हा परिषदेचा निधी उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. ३ डिसेंबर रोजी आनंद देशमाने यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान दोन्ही ठिकाणी दिवे बसवलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दिव्यांचे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गेल्या सहा महिन्यांपासून अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
ग्रामपंचायत वेल्हेच्या सरपंच सीता नंदकुमार खुळे यांच्यासह सदस्यांनी या कामाबाबत ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र ठेकेदाराने कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती ग्रामपंचायतीतून देण्यात आली. या प्रकरणातील कागदपत्रांवरील ग्रामसेवकाची सही तात्कालीन ग्रामसेवक अजित खंडू कुंभार यांनी नाकारली आहे. “सही माझी नाही, शिक्का देखील माझा नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे कागदपत्रे बनावट असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
जिल्हा परिषद पुणे येथे या विभागाचे काम पाहणारे सुहास संचेती यांनी कागदपत्रांनुसार ठेकेदाराने दोनही दिवे बसवल्याचे दाखवून निधी उचलल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. पाहणीदरम्यान सरपंच सीता खुळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप नगीने, सुनील कोळपे, नवनाथ दनाने, माजी उपसरपंच खंडू शेठ गायकवाड, माजी उपसरपंच सुनील राजीवडे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार, विलासराव पांगरे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आनंद देशमाने यांनी ठेकेदारावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तसेच त्याचे नोंदणी रद्द करण्याची मागणी केली आहे.







