पुणे : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचंड सक्रिय झाले असून केंद्र सरकारविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तरुणांची पाठीशी उभी राहिलेली शक्ती आणि वाढता पाठिंबा पाहून त्यांनी आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे.

शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि रोजगाराचा तुटवडा यांसारखे महत्त्वाचे विषय मांडत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी त्यांनी ‘छात्रों की गूंज’ या विशेष अभियानाची सुरुवात केली आहे. याच मालिकेत येत्या 22 ऑगस्ट रोजी ते पुणे दौऱ्यावर येत असून ते Gen Z च्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

आपल्या सोशल मीडिया संदेशाद्वारे या दौऱ्याची घोषणा करताना त्यांनी देशातील तरुणींच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष वेधले. “भारतातील प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण, समान संधी, योग्य हक्क आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. परंतु आजही त्यांना स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष का करावा लागतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्या नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाकडून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आणि मनोज त्यागी यांसारखे आघाडीचे नेते या दौऱ्याच्या आयोजनात सक्रिय आहेत.
दुसरीकडे, तरुण मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत. आगामी निवडणुकांचा काळ जवळ येत असल्याने हा राजकीय डावपेचांचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. त्यामुळे या राजकीय संघर्षात तरुण वर्ग कोणाच्या पाठीशी उभा राहतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






