पुणे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आरक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी या बैठकीसाठी सर्व तज्ज्ञांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आंदोलनाची आगामी रूपरेषा निश्चित करणे अत्यंत गरजेचे असल्याने, ते डॉक्टरांकडून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलंबित असून, हे आंदोलन आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. या बैठकीत अभ्यासकांशी सखोल चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा, कायदेशीर बाबी आणि भविष्यातील कृती कार्यक्रम निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आणि त्यातून निघणाऱ्या निर्णयांकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे







