पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड परिसरातील कुरुळी गावच्या हद्दीत एका पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवले असल्याची घटना समोर आली आहे.प्रियांका मारुती इगवे असे मृत महिलेचे नाव असून, महादेव मारुती इगवे असे आत्महत्त्या केलेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पिसेगावचे रहिवासी असून कुरुळी भागात भाड्याने राहत होते. पत्नीचे एका अन्य व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय महादेव यांना होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या सुमारास या वादातून महादेव यांनी प्रियांका यांची हत्या केली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या हत्येनंतर पतीने त्याच खोलीत स्वतः फाशी घेतली. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान वाकड परिसरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ११ August रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली. पीडित महिला स्वयंपाकघरात औषध घेत असताना पतीने तिला जवळ येण्यास सांगितले. परंतु, कंबरदुखी आणि मुले जागी असल्याचे सांगत महिलेने नकार दिला.

याच रागातून पतीने “तुझे नेहमीचेच आहे” असे म्हणत पत्नीचा गळा दाबला आणि तिच्या कमरेवर चाकूने वार केले, ज्यामध्ये ती जखमी झाली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







