पुणे: मुंबईप्रमाणेच वाहतूक कोंडीसाठी (Pune News) ओळखले जाणारे पुणे शहर पुन्हा (Sinhagad Road Bridge) एकदा चर्चेत आले आहे. शहरात दिवसभर सतत वाहतूक असते आणि या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारकडून नव्या उड्डाणपुलांची घोषणा होत आहे. मात्र अलीकडेच समोर आलेल्या एका नव्या प्रकल्पामुळे पुणेकरांमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी वाढणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी सिंहगड रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल 118 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु आता त्याच रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार असल्याने हा उड्डाणपूल अंशतः तोडावा लागणार आहे. त्यामुळे नुकताच बनलेला पुल काही प्रमाणात निष्प्रयोज्य होणार असल्याची चिंता नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
महानगरपालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी उड्डाणपुलाला एकूण 66 ठिकाणी छेद देणे आवश्यक आहे. म्हणजेच, पुलाचा काही भाग पाडून त्यातून मेट्रोचे खांब वर नेण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून नव्याने मंजूर करण्यात आलेल्या खडकवासला–हडपसर–खराडी आणि नळस्टॉप–माणिकबाग या 32 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांसाठी सिंहगड रोडवरील उड्डाणपुलावर हा परिणाम होणार आहे. बांधकाम सुरू असताना वाहतुकीचा ताण वाढेल आणि आधीच कोंडीत अडकलेल्या नागरिकांना आणखी अडचण भासेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
118 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या उड्डाणपुलानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू होणार असल्याने सरकारी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केलेले काम नागरिकांना कितपत उपयोगी पडते, हे आता मेट्रोच्या कामानंतरच स्पष्ट होणार आहे.







