Akola : अकोल्यात पोलिसांनी जे काम केलं, त्याने सगळाच जिल्हा भावूक झाला आहे. साधारणपणे पोलिस म्हटलं की खाकी वर्दी, कडकपणा आणि शिस्त एवढंच डोळ्यांपुढे येतं. पण याच खाकीत किती माया, किती माणुसकी दडलेली असते याचं उत्तम उदाहरण अकोला पोलिसांनी दाखवून दिलं. तब्बल 21 दिवसांपासून हरवलेला 15 वर्षांचा ऋषिकेश कनोजिया अखेर पोलिसांनी सुखरूप सापडवून आईच्या कुशीत परत आणला. आईच्या डोळ्यातून वहाणारे अश्रू आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं.

ऋषिकेश नववीत शिकणारा मुलगा. 11 सप्टेंबरला किरकोळ कारणावरून वडिलांनी त्याला रागावलं आणि त्याच्या मनाचा ठाव गेला. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला आणि थेट रेल्वे स्टेशनला पोचला. तिथून नागपूर–कोल्हापूर ट्रेन पकडून तो कुठेतरी दूर गेला. पुढच्या 21 दिवसांत तो तीन वेगवेगळ्या शहरांत फिरत राहिला. शेवटी पंढरपूरमध्ये एका हॉटेलमध्ये कामालाच लागला. मुलगा कुठे असेल, खाल्लं असेल की नाही, सुरक्षित असेल की नाही या काळजीने त्याचे आई-वडील अक्षरशः खंगले होते.
त्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतःच हे प्रकरण हातात घेतलं. ऋषिकेशला शोधून काढण्यासाठी तीन पथकं तयार झाली. एसपींसह चार वरिष्ठ अधिकारी, 20 अंमलदार आणि दहा-बाराजणांचा पोलिस कर्मचारीवर्ग एवढी मोठी टीम त्याच्या शोधासाठी रात्रंदिवस धावत राहिली. अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, परळी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर असे आठ जिल्हे अक्षरशः पालथे घातले गेले. जवळपास 1500 किमीचा पट्टा तपासण्यात आला.
दरम्यान, स्टेशन, हॉटेल्स आणि बाजारपेठांमधील 400 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. नातेवाईक, मित्र, शाळेतील मुलं व शिक्षक मिळून तब्बल 300 जणांची चौकशी झाली. छोटा मोठा असा कुठलाही क्लू वाया जाऊ दिला नाही. अखेर पंढरपूरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाबद्दल माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ धाव घेत ऋषिकेशला सुरक्षित ताब्यात घेतलं.
घराचा दरवाजा उघडला आणि 21 दिवसांनी मुलगा समोर उभा राहिला. त्या क्षणी आई उषा कनोजियांचे डोळे पाणावले. समाधान, सुटका, कृतज्ञता सगळं एकदम बाहेर आलं. त्या क्षणी पोलिसांच्याही चेहऱ्यावर उमटलेलं समाधान खरंच शब्दात मावणाऱं नव्हतं.
एसपी अर्चित चांडक म्हणाले, “प्रत्येक मूल हे सगळ्यांचंच असतं. एखादं मूल हरवलं म्हणजे ती फक्त तक्रार नसते; त्या कुटुंबावरचा डोंगर हलवणं ही आमची जबाबदारी आहे.” त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कामाचं जिल्हाभर कौतुक होत आहे.
या सगळ्या प्रकरणानं एक गोष्ट पुन्हा समोर आली आजच्या मुलांमध्ये वाढलेली चिडचिड, ताण, आणि घरात कमी झालेला संवाद. मोबाईल, सोशल मीडिया यामुळे पालक मुलांमधलं बोलणंच कमी झालं आहे. वेळेत संवाद झाला असता तर कदाचित अशी घटना घडलीच नसती.
अकोला पोलिसांनी दाखवलेली चिकाटी, संवेदनशीलता आणि माणुसकी हे खरंच समाजाला प्रेरणा देणारं आहे. ऋषिकेशला शोधणं हा फक्त तपास नव्हता… तो माणुसकीचा जिवंत धडा होता.







