Pune News: पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तलेरा रुग्णालयातून अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना बुधवारी पहाटे 2.30 ते 3.00 दरम्यान घडल्याची माहिती मिळते.

हेही वाचा- दारू पिण्यास पैसे न दिल्याने बिअरची बाटली फोडली डोक्यात उरुळी कांचन येथील वर्दळीच्या चौकातील घटना
प्रसूतीवेदना सुरू असताना महिलेवर तातडीची वैद्यकीय मदत न करता, केवळ डाव्या कुशीवर झोपा असा सल्ला देत उपचारासाठी विलंब करण्यात आला असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या गंभीर आरोपानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने चौकशी सुरू केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही 23 वर्षीय महिलेची पहिली गर्भावस्था होती. तिच्या सर्व नियमित तपासण्या तलेरा रुग्णालयात होत होत्या आणि डॉक्टरांनी बाळ व्यवस्थित असल्याचे सांगितले होते. मंगळवारी संध्याकाळी 6.00 वाजल्यापासून तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी उपचार न करता केवळ स्थिती बदलण्याचा सल्ला दिला, अशी तक्रार आहे.
रात्री वेदना तीव्र झाल्यानंतर नातेवाईक प्रसूती कक्षात गेले असता, तेथे उपस्थित डॉक्टर झोपलेल्या अवस्थेत आढळल्याचा असा आरोप कुटुंब सदस्यांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.
यानंतर महिलेचा प्रसूती कक्षात नैसर्गिक प्रसूतीद्वारे बाळंतपण करण्यात आला. मात्र नवजात शिशूला वाचवता आले नाही. प्रसूतीवेदना सुरू असताना तातडीने सोनोग्राफी केली असती, तर बाळ अडथळ्यात अडकल्याचे दिसून आले असते आणि लगेच प्रसूती केली असती, तर बाळाचा जीव वाचू शकला असता, असे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर येत आहे.
धक्कादायक म्हणजे, या प्रसुतीच्या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाणी उपस्थित नसल्याचेही सांगितले जात असून चौकशी अहवालानंतरच याबाबत अधिक तपशील स्पष्ट होणार आहे.






