Pune Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा तीडा अखेर सुटणार आहे. जुनी संरेखना रद्द करून नवा मार्ग ठरवण्यात आला आहे. आधीचा मार्ग नारायणगावातून जात होता, पण तो थेट ‘जीएमआरटी’ या जागतिक खगोलनिरीक्षण केंद्राच्या खूप जवळून जाणारा होता. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने याला मोठा आक्षेप घेतलाय. त्यामुळे रेल्वेमुळे दुर्बिणीची निरीक्षणं बिघडू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला. आता नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला आहे (Pune Nashik High-Speed Railway)

म्हणून राज्य सरकार, तज्ज्ञ आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या चर्चा-मसलतीनंतर ‘GMRT’ चा परिसर पूर्ण टाळून नवी अलाइन्मेंट निश्चित करण्यात आली. आता हा मार्ग पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे) -अहिल्यानगर – निंबळक – पुणतांबा – पिंपळगाव – साईनगर शिर्डी- नाशिक असा असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (Pune Nashik High-Speed Railway)
अलाइन्मेंट बदलता येते का?
या मार्गात बदल करताना राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA), अणुऊर्जा विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त समितीने तांत्रिक तपासणी केली का, असा प्रश्न मांडण्यात आला.
दुसरीकडे तळेगाव उरळी कांचन मार्गावरच्या मुंबई-मिरज तिसरी-चौथी मार्गिका विस्ताराला खेड तालुक्यात मोठा विरोध होत आहे. बऱ्याच घरांवर आणि शेतीवर गदा येणार असल्याने १२ गावांमधील नागरिक भडकलेत. या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अलाइन्मेंट थोडी १५-२० किमी उत्तरेकडे हलवता येईल का, असाही मुद्दा उपस्थित झाला. यावर वैष्णव यांनी ”रेल्वे मंत्रालयाची ताठर भूमिका नाही; चर्चा होऊ शकते”असं सूचक उत्तर दिलं.
सध्याची प्रगती : काय झाले, काय सुरू आणि काय बाकी?
नाशिक रोड-साईनगर शिर्डी दुहेरीकरणाचा डीपीआर तयार.
साईनगर शिर्डी-पुणतांबा (१७ किमी) दुहेरीकरणासाठी २४० कोटींची मंजुरी.
पुणतांबा-निंबळक (८० किमी) दुहेरीकरण पूर्ण.
निंबळक-अहिल्यानगर (६ किमी) दुहेरीकरणाचं काम सुरू.
अहिल्यानगर-पुणे (१३३ किमी) नवीन दुहेरी मार्गाचा ८,९७० कोटी रुपयांचा डीपीआर तयार-यामुळे चाकण MIDC ला थेट रेल्वे जोड मिळेल.







