Pune-Daund Demu : दौंड, (पुणे) : पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर सोमवारी (ता. 11) रात्री एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पुणे-दौंड डेमू (DEMU) गाडीच्या चाकांनी अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी तासनतास स्थानकावर अडकून पडावे लागले. Pune-Daund Demu

सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पुणे वरून दौंडच्या दिशेने जाणारी डेमू गाडी पाटस रेल्वे स्थानकात आली. गाडी प्लॅटफॉर्मवर उभी राहत असतानाच एका डब्याच्या चाकांमधून अचानक धूर आणि आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आगीचे स्वरूप पाहून डब्यातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. Pune-Daund Demu
घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. प्राथमिक तपासणीनुसार, ‘ब्रेक बाइंडिंग’ (Breaks Binding) झाल्यामुळे चाके प्रमाणाबाहेर गरम झाली आणि त्यांनी पेट घेतला असावा, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तवला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. Pune-Daund Demu
आग विझवण्यासाठी आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी गाडी तब्बल दीड तास पाटस स्थानकातच उभी होती. रात्रीची वेळ असल्याने आणि स्थानकावर पिण्याच्या पाण्याची किंवा इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा माहिती न मिळाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. Pune-Daund Demu
दरम्यान, “रेल्वे गाड्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे,” असा आरोप प्रवाशांनी केला आहे. “मोठा अनर्थ घडला असता तर याला जबाबदार कोण?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने केवळ चौकशीचे सोपस्कार न पार पाडता, जुन्या झालेल्या गाड्यांची तातडीने तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. Pune-Daund Demu






