पुणे : व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कामगाराने कपाटातील 10 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 57 वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात राहतात. त्यांचे शुक्रवार पेठेतील सुभाषनगर येथे कार्यालय आहे. या कार्यालयात अखिलेश बसंतलाल वर्मा (रा. पुरोहा, प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा तरुण कामगार म्हणून कामाला होता.
14 एप्रिल रोजी आरोपी वर्मा याने कार्यालयात ठेवलेली 10 लाख रुपयांची रोकड मालकाच्या नकळत चोरली आणि तो तिथून पसार झाला. बराच वेळ तो कार्यालयात न दिसल्याने आणि रोकड गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता त्याचा फोन ‘स्विच ऑफ’ येत होता. तो मूळ गावी पसार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, खडक पोलिसांनी आरोपी अखिलेश वर्मा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याने पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत.







