पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात (Pune Crime) कार्यरत असलेल्या एका (PCMC News) उपनिरीक्षकाने स्वतःच्या भावाला पोलीस दलात भरती करून घेण्यासाठी थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तब्बल नऊ वर्षांनी या फसवणुकीचा पर्दाफाश झाला असून पुणे पोलिसांनी संबंधित उपनिरीक्षकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असून त्याच्या भावाचे नाव गजानन शिवलाल गुसिंगे आहे. दोघेही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी, रोहिलागड येथील रहिवासी आहेत. 24 एप्रिल 2016 रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत ही फसवणूक झाली.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्पडसिंग गुसिंगे याने भावाला पोलीस दलात दाखल करण्याचा प्रयत्न करत त्याच्या जागी स्वतःच परीक्षेला हजेरी लावली. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. हा प्रकार दीर्घकाळ लपवून ठेवला गेला. मात्र अलीकडेच झालेल्या पडताळणीत ही अनियमितता लक्षात आली आणि तपास अधिकाऱ्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या दोघांवर तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवणे आणि कट रचणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचेही आरोप लावण्यात आले आहेत. तपासात आणखी कोणी या फसवणुकीत सहभागी होते का, याचीही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील सुरक्षा आणि पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकाराचे प्रकार रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अधिकारी सांगत आहेत.







