Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ”या चण्याचा मर्डरच करीन… तुकडे तुकडे करीन” अशी सरळसरळ जीवाची धमकी देत एका व्यावसायिकाकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केलं आहे. (Pune Crime)

संदीप भिकाजी देवगिरीकर ऊर्फ चण्या (वय ३९, वडगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सचिन हनुमंत देवगिरीकर (३५, धबाडी, वडगाव) याला पकडलं. त्याचे साथीदार किरण देवगिरीकर (४०), अमित दिघे (४०) आणि मंदार मण्यारे (२६) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ डिसेंबरला दुपारी सव्वाचार वाजता वडगावमधील सद्गुरु कृपा इमारतीजवळ घडला.
पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन देवगिरीकर हा काही साधा माणूस नाही. २०१३ मध्ये खराडी परिसरात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता आणि त्यातून तो सुटलेला आहे.
फिर्यादी संदीप देवगिरीकर हे जुन्या गाड्यांचा व्यापार करतात. घटनेच्या दिवशी ते सद्गुरु कृपा इमारतीजवळ थांबले असताना, त्यांना ओळख असलेला सचिन आणि त्याचे तिघे साथीदार तिथे आले. काही न बोलता सचिनने त्यांना शिवीगाळ सुरू केली. संदीप यांनी ”मला असे शिव्या देऊ नकोस” म्हटल्यावर तर तो अधिकच पेटला आणि जीवघेणी धमकी देत ५० लाखांची खंडणी मागू लागला.







