पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने (Pune Crime) मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल 5 कोटी 42 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. हा गांजा खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. संबंधित प्रवाशाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

11 फेब्रुवारी रोजी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने बँकॉकहून पुण्यात आलेल्या या प्रवाशाच्या हालचाली अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. नियमित तपासणीऐवजी त्याच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यावेळी पाच खेळण्यांच्या बॉक्समध्ये कार्बन पेपरमध्ये गुंडाळलेली पारदर्शक पाकिटे आढळली. तपासणीअंती त्यात 5 किलो 429 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
हायड्रोपोनिक गांजा हा अत्याधुनिक पद्धतीने, नियंत्रित वातावरणात तयार केला जाणारा आणि सामान्य गांजापेक्षा अधिक प्रभावी मानला जाणारा अंमली पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची मोठी मागणी असल्याने त्याची किंमतही प्रचंड असते. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 5 कोटी 42 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत संबंधित प्रवाशाने समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा माल कोणाकडून घेण्यात आला, भारतात कोणाला देण्यात येणार होता आणि त्यामागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय मार्गांद्वारे पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे विमानतळावरील तपासणी अधिक कडक करण्यात आली असून, या प्रकरणातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







