पुणे: कोरेगाव पार्क येथील महार वतनाच्या 40 एकर जागेच्या (Parth Pawar Land Scam) व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलं आहे. या जागेचा (Pune News) दस्त नोंदविताना जुना बंद सातबारा उतारा वापरण्यात आला असून ऑनलाइन सातबारा तपासला गेला नाही, असा ठपका नोंदवला गेला आहे. तसेच स्थावर मालमत्ता असताना ती जंगम असल्याचं दाखवून ई-फेरफार प्रक्रिया टाळण्यात आल्याचंही समोर आलं आहे. (Latest Breaking News)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्राच्या मालकीच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजयसिंह पाटील आणि जागेचे कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात या जमिनीचा खरेदी-विक्री करार झाला होता. ही जमीन शासकीय असून महार वतनाची जमिन विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही, हे असूनही तिचा व्यवहार झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
हेही वाचा: गुंडांना जामीन आणि नेत्यांना जमीन? पुण्यात ‘कोयता गँग’ची Video शेअर करत, रोहित पवारांचा सवाल
समितीने दिलेल्या अहवालात निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी केलेल्या अनियमिततेची नोंद केली आहे. दस्त नोंदणी करताना संबंधित जमिनीचा ऑनलाइन सातबारा उतारा तपासणं आवश्यक असताना त्यांनी तो तपासला नाही, तसंच बंद झालेला जुना उतारा दस्ताला जोडला. उद्योग संचालनालयाचे आवश्यक पात्रता प्रमाणपत्र नसतानाही मुद्रांकन शुल्कात सवलत घेऊन दस्त नोंदणी करण्यात आली. नंतर ई-म्युटेशन प्रक्रियेसाठी दस्त पाठविताना स्थावर मालमत्तेऐवजी जंगम मालमत्ता असा पर्याय निवडला गेला. शिवाय दस्त ऑफलाइन करून तो म्युटेशन विभागाकडे पाठविण्यात आला. सामान्य नागरिकांना तांत्रिक बिघाडाच्या वेळी अडचण येऊ नये म्हणून ऑफलाइन पर्याय उपलब्ध आहे, मात्र या प्रकरणात गैरव्यवहार करण्यासाठीच त्याचा उपयोग झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे संबधित विभागातील कामकाजावरील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता यावर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.







