मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या उत्साहावर भुलेश्वर येथील दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ या 27 फूट उंच गणेशमूर्तीच्या आगमन सोहळ्यात क्रेनचा अपघात होऊन मूर्ती खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून लहान मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत.या अपघाताच्या पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटना घडताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून सुरुवातीला क्रेनचे नट-बोल्ट निसटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मात्र आता तपासात केवळ नट-बोल्ट तुटले नसून क्रेनच्या मुख्य सपोर्ट सिस्टीमचे वेल्डिंग अचानक उखडल्याची नवी माहिती समोर आली आहे.वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्तीचा संपूर्ण भार नट-बोल्टवर आला आणि ते दाब सहन न झाल्याने उखडले. यामुळे क्रेन मालकाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

या भीषण अपघातात ‘भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी यांना आपला जीव गमवावा लागला. भव्य मूर्तींच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी स्ट्रक्चर आणि वेल्डिंगचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे असते. या दुर्घटनेनंतर मुंबईतील अतिउंच मूर्तींचे आगमन, क्रेनची क्षमता आणि तांत्रिक ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे.







