पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले.

या प्रकरणात आरोपीवर नसरापूरप्रमाणे जलदगती न्यायालयात अर्थात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषी ठरल्यास फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांना सांगितले. तसेच तपासात कोणताही विलंब होऊ न देता प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांची आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार शरद सोनवणे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी फोनवरून कुटुंबीयांशी संवाद साधला. घटनेबाबत पोलिस महासंचालकांशी स्वतः चर्चा करून तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढवण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस उपअधीक्षकांनी ग्रामीण भागातील समाजकंटक, दारुडे आणि गावगुंडांवर कठोर कारवाई करून त्यांच्यात कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी सूचना त्यांनी केली. महिला सुरक्षेसाठी ग्रामीण भागात नवीन कार्यपद्धती तयार करण्याची गरज असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
या घटनेत जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथील दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय आरोपीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. मुलीचा शोध घेण्याच्या नावाखाली तो पोलिसांसोबत फिरत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे समोर आले.
मुलगी चौथीत शिकत होती. ती आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारी घरात पालक नसल्याची संधी साधून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर मुलगी घरात दिसत नसल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला होता. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
या गंभीर प्रकरणात तपासाला वेग देऊन आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याने आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








