NCP Big Update : मुंबईतील राजकीय घडामोडींमध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाला आता दिशा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बैठकीत नाव जाहीर?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या अलीकडील बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या औपचारिक घोषणा बाकी असून ती २६ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही दिवसांपासून पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा रंगली होती. अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांनीच नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती. पक्षात स्थैर्य आणि पवार कुटुंबाचे नेतृत्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
प्रफुल पटेल यांची भूमिका
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर उपस्थित आमदारांनी हात वर करून समर्थन दर्शवले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे पक्षातील संभाव्य अंतर्गत स्पर्धेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
२६ फेब्रुवारीला शिक्कामोर्तब?
२६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार अधिकृतरीत्या पक्षाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सुनेत्रा पवार यांना पुढे करून पक्षाने सातत्य आणि स्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.
राज्यातील सत्तासमीकरणांवर आणि राष्ट्रवादीच्या भविष्यातील धोरणांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष एकसंघ असल्याचा संदेश देणे नेतृत्वासाठी आवश्यक आहे.
आता सर्वांचे लक्ष २६ फेब्रुवारीकडे लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होताच राष्ट्रवादीच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







