Crime : राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारळीबाग परिसरात एका विवाहित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सायंकाळी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपी सचिन सोनवणे याने तिचा रस्ता अडवत अश्लील स्वरूपाची मागणी केली. महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याने बळजबरीने तिचा हात धरून विनयभंग केला, असा आरोप आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिची भावजय घटनास्थळी आली. तिने आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी सचिन सोनवणे आणि त्याचा साथीदार राजू सोनवणे यांनी पीडित महिला व तिच्या नातेवाईकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहायक फौजदार मिसाळ पुढील तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागरिकांत संताप
घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात अशा प्रकारे महिलेला त्रास देण्याच्या प्रकारामुळे नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.







