Crime : नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पोलिसांच्या वर्तणुकीबाबत अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप समोर आले आहेत. किरकोळ वादातून ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून प्रत्येकी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास जामीन होऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आणि त्यानंतर एका तरुणाच्या तोंडावर लघुशंका केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी लहरी गावात नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान किरकोळ वाद झाला होता. या वादातून परस्पर गुन्हे दाखल झाले. दुसऱ्या दिवशी संबंधित पोलीस उपनिरीक्षक गावात गेले आणि अक्षय कांबळे याच्यासह आणखी चार तरुणांना चौकशीच्या नावाखाली पोलीस स्टेशनला नेले. अक्षयच्या म्हणण्यानुसार, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या खोलीत घेऊन मारहाण करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी आल्यावर काहीही सांगू नये, अशी ताकीद देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मारहाणीबरोबरच प्रत्येकाकडून १० हजार रुपये मागण्यात आले. पैसे न दिल्यास गंभीर गुन्हे लावून तीन महिने जामीन मिळू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. सर्वात गंभीर आरोप म्हणजे एका खोलीत नेऊन अमानुष वागणूक देण्यात आल्याचा आहे. या प्रकारानंतर भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी हदगाव पोलीस स्टेशनला घेराव घालत संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नाही. पोलिसांवर असलेला लोकांचा विश्वास डळमळीत करणारी ही बाब आहे. कायदा अंमलबजावणी करणाऱ्यांकडूनच अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे आरोप सिद्ध झाले, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी सामाजिक दबाव वाढत असून या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.







