Nashik Accident: नाशिक : सप्तश्रृंगी गडावरून परत येत असलेल्या भाविकांवर रविवारची सायंकाळ घातक ठरली. एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कार थेट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती पॉईंट परिसरात ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना रविवार संध्याकाळी घडली. MH 15 BN 0555 या कारमधील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. रविवारीची सुट्टी म्हणून घरातून ते सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले. दर्शन झाल्यानंतर ते घराकडे निघाले होते. मात्र घाटातील वळणावर कार थेट दरीत कोसळली.
भीषण अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले, परंतु कोणालाही वाचवता आले नाही. किर्ती पटेल (50), रशिला पटेल (50), विठ्ठल पटेल (65), लता पटेल (60), पचन पटेल (50), मनी बेन पटेल (70) अशी अपघातात मृत्य झालेल्या व्यक्तींची नावे आहे.
भीषण अपघातानंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. तसेच मदतकार्य सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.





