Ichalkaranji : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात कॅफे संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश निर्भया पथकाने केला आहे. शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ या ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील कृत्ये सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केला आणि तेथील धक्कादायक वास्तव उघडकीस आणले. या कारवाईमुळे केवळ शहरातील तरुणाईतच नाही, तर कॅफे चालकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. (Ichalkaranji)

निर्भया पथकाने केलेल्या छापेमारीत ‘कॅफे अड्डा’ मध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम्स, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रुम, आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे फक्त ३५० रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी विशेष खोली (Special Room) भाड्याने दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, कॅफेमध्ये कंडोमची पाकिटे देखील आढळून आल्याची माहिती आहे. पथकाने छापा मारताच कॅफेत उपस्थित असलेल्या कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर ग्राहकांची मोठी धांदल उडाली. हा कॅफे आंबट शौकिनांचा अड्डा बनला होता, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकाराबद्दल निर्भया पथकाने तातडीने कठोर कारवाई करत कॅफेचा मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईची माहिती शहरात पसरताच अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शिस्त राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.







