मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली असून उपनगरातील माहूल परिसरात स्वस्त दरात त्यांना घर मिळणार आहेत . या घरांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली असून लॉटरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना ही घर विकली जाणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या माहुल परिसरात 225 चौ फुटांची 4 हजार 700 घरे बांधली असून त्याची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.लॉटरीच्या माध्यमातून ही घरे त्यांना विकली जाणार असून या घरासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. महापालिका प्रशासनाने माहूल येथे बांधलेल्या इमारतीच्या संकुलात शाळेसह, रुग्णालय व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारावर घरे रिक्त आहेत. या रिक्त घरांची पालिकेला देखभाल करावी लागते, त्यामुळे आता ही घरे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे








