missing link project : मुंबई–पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित Mumbai-Pune Expressway Missing Link प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. केवळ एका डेक सेक्शनचे काम बाकी असून, १ मेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमका फायदा काय?
१३.३ किलोमीटर लांबीचा हा नवीन मार्ग सध्याच्या Yashwantrao Chavan Expressway वरील खंडाळा–लोणावळा दरम्यानच्या १९.८ किलोमीटरच्या धोकादायक घाटमार्गाला बायपास करणार आहे. लोणावळा–खंडाळा घाटातील तीव्र उतार, तीक्ष्ण वळणे आणि पावसाळ्यातील धुके यामुळे हा पट्टा अपघातप्रवण मानला जातो. नव्या संरेखनामुळे ही धोकादायक वळणे टाळली जाणार असून वाहनचालकांना अधिक चांगली दृश्यमानता मिळेल. परिणामी अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे.
या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे अंतर सुमारे ६ किलोोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ अंदाजे २५ ते ३० मिनिटांनी वाचेल. सध्या या द्रुतगती मार्गावर दररोज सुमारे ७५ हजार वाहने धावतात; सुट्टीच्या किंवा विकेंडला हा आकडा १.२० लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अलीकडील गॅस टँकर अपघातांसारख्या घटनांनी पर्यायी आणि सुरक्षित मार्गाची गरज अधोरेखित केली होती.
टोल वाढणार का?
या नव्या मार्गाबाबत सर्वसामान्यांची मोठी चिंता टोलवाढीची होती. मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की टोल दरात अचानक वाढ होणार नाही. टोल वसुलीची मुदत २०४५ पर्यंत वाढवण्यात आली असून दर पाच वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल. पुढील दरआढावा २०३० मध्ये होणार आहे.
सुरक्षेचा मुद्दा
प्रकल्प पूर्णत्वास जात असला तरी काही नेत्यांनी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. Milind Narvekar यांनी Devendra Fadnavis यांना सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय मार्ग खुला करू नये, अशी विनंती केली आहे. बोर घाटातील मुसळधार पाऊस, धुके आणि वाऱ्याचा ताण लक्षात घेता सुरुवातीच्या सहा महिन्यांत जड वाहनांवर निर्बंध घालण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
एकूणच, ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा असली, तरी अंतिम निर्णय सुरक्षा मानकांवर अवलंबून असेल. मुंबई–पुणे प्रवासाचे गणित बदलणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरतो, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.





