Loni kalbhor : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य सरकारकडून देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने” गौरवण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सन 2025-26 या वर्षातील उत्कृष्ट आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख उपक्रम आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापनातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत रविवारी (ता. 22) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” व “महाआरोग्य सन्मान 2025-26” या राज्यस्तरीय सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सेवा परिणामकारकता, मातामृत्यू व बालमृत्यू नियंत्रण, कुटुंब कल्याण कार्यक्रमांची अंमलबजावणी, शस्त्रक्रिया कार्यक्षमता, रुग्णसंख्या आणि डिजिटल आरोग्य जोडणी यांसारख्या महत्त्वपूर्ण निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. याच कार्यक्रमात महाराष्ट्र पॅलेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले.
एच.एम.आय.एस मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे व वाघोली (ता. हवेली) येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल आशा सेविका शोभा सोनबा खेडकर (रांजणगाव), त्यांच्या गट प्रवर्तक श्रीमती आशा सुर्वे तसेच जिल्हा समूह संघटक आशा श्रीमती कीर्ती तागड यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पालखी सोहळ्यातील उत्कृष्ट आरोग्य नियोजनाचा सन्मान..
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या उपक्रमांतर्गत आळंदी-देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात उत्कृष्ट नियोजन व नियंत्रण केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपसंचालक डॉ. भगवान पवार, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले, औंध यासह जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोय कर्मचारी, व आशासेविका उपस्थित होत्या.
हा ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार म्हणजे लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य यंत्रणेने गेल्या वर्षभरात घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. आरोग्य विभागाच्या तळागाळातील कर्मचाऱ्यांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच आम्ही पुरस्काराचे मानकरी ठरलो आहोत. हा सन्मान आम्हाला भविष्यात अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रेरित करेल.
डॉ. मेहबूब लुकडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर, ता. हवेली






