लोणी काळभोर : थेऊर, (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यातील थकीत ऊसबिलावरील व्याज न घेण्याबाबत सभासदांकडून संमतीपत्र घेताना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) प्रशांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

यशवंत सहकारी साखर कारखान्यातील थकीत ऊसबिलांच्या पेमेंटवरून निर्माण झालेल्या वादात पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) यांनी कारखाना व्यवस्थापनाला हे निर्देश दिले आहेत.
कारखान्याचे सभासद भरत लक्ष्मण कुंजीर व अन्य तिघांनी मंगळवारी (ता. 03) यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. सन 2009-10 या हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे उर्वरित पेमेंट तसेच सन 2010-11 हंगामातील एफआरपीपैकी थकीत ऊसबिलांचे धनादेश वाटप करताना व्याज न घेण्याच्या संमतीपत्रावर कारखान्याचे कार्यकारी संचालक व संचालकांकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

कारखान्याने तयार केलेले संमतीपत्र रद्द करून प्रत्येक सभासदाकडून त्याच्या इच्छेनुसार आणि स्वहस्ताक्षरात संमतीपत्र घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच सभासदांच्या पेमेंटची माहिती नोटीस बोर्डावर, गावनिहाय व्हॉट्सॲप याद्यांद्वारे आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावी. सभासद व कामगारांच्या पेमेंटची रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवून त्यातूनच भुगतान करावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली होती.

दरम्यान, या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक उपसंचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून संमतीपत्रासाठी कोणतीही सक्ती करू नये, असे बजावले आहे. एफआरपी पेमेंट आणि थकीत ऊसबिलांच्या संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदी, शासन निर्णय, परिपत्रके तसेच साखर आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी. भविष्यात अशा प्रकारची तक्रार निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.






