पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची अडवणूक करत खासगी बस कंपन्यांनी भाड्यात भरमसाठ वाढ केली आहे. नेहमीच्या तिकीट दरांपेक्षा दोन ते तीन पट अधिक रक्कम वसूल केली जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. काही प्रमुख मार्गांवर तर तिकीटाचे दर तब्बल 7000 रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे.

पुण्याहून सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांवर भाडेवाढ सर्वाधिक दिसून येत आहे. ते पुढीलप्रमाणे..
1.पुणे ते नागपूर (एसी स्लीपर): सणाच्या काळात प्रति प्रवासी 4200 रुपये भाडे आकारले जात आहे.

2.पुणे ते जळगाव (एसी स्लीपर): या प्रवासासाठी 1500 रुपये मोजावे लागत आहेत.

दिवाळीनंतरचे दर: सण संपल्यानंतर याच मार्गांवर नागपूर व जळगावहून पुण्याला येण्यासाठी एसी स्लीपरचे दर 900 रुपये होतात.
खासगी प्रवासी एजंट्सच्या दाव्यानुसार, इतर दिवशी कमी प्रवाशांमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी सणासुदीच्या काळात दरवाढ करावी लागते. नियमानुसार तीन पट भाडे आकारण्याची मुभा असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. एका एजंटने खासगी बसच्या भाड्याची तुलना थेट शेअर बाजाराशी करत मागणीनुसार दर बदलतात असे स्पष्ट केले.
खासगी बस चालकांच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 23 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या काळात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.
जादा भाडे वसूल करणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि बस कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी RTO कडून व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक जारी करण्यात आला आहे. प्रवाशांनी तिकीट दरवाढीविरोधात या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, कारवाईचा इशारा देऊनही अनेक ठिकाणी प्रवाशांची आर्थिक लूट अजूनही सुरूच आहे.






