पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रो उदघाटनानंतर शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली. मेट्रोला मंजुरी मिळल्यानंतर तब्बल 7 वर्षानंतर पुणेकरांना मेट्रो पाहायला मिळाली आहे. या उत्साहात नागरिकांनी अतिशय आनंदात मेट्रोने प्रवासही केला. त्यामध्येच आता पीएमपीनेही हातभार लावला आहे. पीएमपीने
पुणे मेट्रोने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ‘वन पुणे कार्ड’उपलब्ध करून दिले आहे. हे एक नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असून, याद्वारे मेट्रो प्रवासासोबतच इतर सामान्य खरेदीसाठीही डिजिटल व्यवहार करणे सहज शक्य होते.

पीएमपीने उपलब्ध करून दिलेल्या या कार्डमुळे वेळेची बचत व सुलभ प्रवास होऊ शकतो.तिकीट खिडकीवर रांगेत उभे न राहता स्टेशनवरील एन्ट्री आणि एग्झिट गेटवर कार्ड टॅप करून थेट प्रवास करता येतो.या कार्डचा वापर करून प्रवास केल्यास तिकीट दरावर 10% सवलत मिळते. तसेच वीकेंडला (शनिवार आणि रविवार) बिगर-केवायसी कार्डधारकांसाठी ही सवलत 30% पर्यंत असते.
कार्डचे शुल्क व मर्यादा (KYC कार्डसाठी)

जारी करण्याचे शुल्क: ₹ 100

वार्षिक देखभाल शुल्क: ₹ 75
कार्ड बदलण्याचे शुल्क (नवे कार्ड): ₹ 100
किमान रिचार्ज (Top-up): ₹ 50
कमाल शिल्लक मर्यादा: ₹ 2,000
लोडिंग शुल्क: रिचार्ज रकमेच्या 1.8% (जास्तीत जास्त ₹ 12 पर्यंत)
हे कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांनी जवळच्या पुणे मेट्रो स्टेशनवरील काउंटरला भेट देऊन किंवा ऑनलाइन ई-फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. कार्ड मिळाल्यानंतर पहिल्यांदा वापरण्यापूर्वी ते स्टेशनवरील POS मशीनमध्ये टाकावे लागते. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून आणि स्वतःचा पिन सेट करून हे कार्ड सक्रिय करता येते.
प्रवासी हे कार्ड मेट्रो स्टेशनच्या तिकीट काउंटरवरून, Add Value Machine (AVM) वरून किंवा अधिकृत ग्राहक पोर्टलद्वारे सहज रिचार्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने रिचार्ज केल्यानंतर स्टेशनवर जाऊन AVM मशीन किंवा काउंटरद्वारे ‘बॅलन्स अपडेट’ करणे गरजेचे आहे.
पुण्यात मेट्रोचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद बनवण्यासाठी हे ‘वन पुणे कार्ड’ अत्यंत उपयुक्त ठरत आहे.







