पुणे : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाघोलीतील लोहगाव चौकातून अहिल्यानगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

वाघोली परिसरातील वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंददरम्यान वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेषतः वाघोली गावठाणातील रस्ता अवघा १० ते १५ फूट रुंद असल्याने दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ही समस्या लक्षात घेऊन वाघोली-लोहगाव गावठाण रस्त्याने पुणे-अहिल्यानगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या वाहतूक बदलानुसार, आव्हाळवाडीकडून वाघोली-लोहगाव गावठाणाकडे येणाऱ्या वाहनांना संबंधित मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे.

आव्हाळवाडी तसेच अहिल्यानगर रस्त्याने लोहगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वाघेश्वर चौकातून उजवीकडे वळावे. त्यानंतर लोहगाव चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाघोली परिसरात वाढणारी वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. नव्या एकेरी वाहतूक व्यवस्थेमुळे या मार्गावरील वाहनांची ये-जा अधिक सुरळीत होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. वाहनचालकांनी नव्या वाहतूक बदलांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.







