पुणे : पुण्यातील बहुचर्चित आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि अजित पवार गटाच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला असून त्या गेल्या काही काळापासून तुरुंगात होत्या.

पुणे पोलिसांनी या प्रकरणात त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. लक्ष्मी आंदेकर यांनी जामीनासाठी पुणे सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात अनेकदा अर्ज केले होते. अखेर मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
तुरुंगात असतानाच लक्ष्मी आंदेकर यांनी अजित पवार गटाच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी दिल्यामुळे तत्कालीन राजकीय वर्तुळात अजित पवार गटावर जोरदार टीका झाली होती. असे असूनही त्यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवला.

ही संपूर्ण घटना 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत घडलेल्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येशी जोडलेली आहे. वनराज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये 18 वर्षीय आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी पार्किंगमध्ये दबा धरून आयुषवर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

आयुष हा वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा होता. परंतु, वनराज यांच्या हत्येत आयुषच्या वडिलांचा सहभाग असल्याचा संशय होता. याच रागातून आंदेकर टोळीचे प्रमुख आणि आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांनी या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी बंडू आंदेकर, त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 12 जणांना अटक केली होती. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींनीही तुरुंगात राहूनच निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या लक्ष्मी आंदेकर यांना न्यायालयीन जामीन मिळाला आहे.






