पुणे : गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडले होते. अवकाळी पाऊस आणि सणासुदीच्या दिवसांतील वाढती मागणी यामुळे अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 60 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचले होते. या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरात 35 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली जाणार आहे.

कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी आणि व्यापारातील साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारने आपल्याकडील ‘बफर स्टॉक’चा वापर सुरू केला आहे. ग्राहकांपर्यंत हा स्वस्त कांदा लवकरात लवकर पोहोचावा यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ या विशेष मालगाड्यांची मदत घेतली जात आहे. नाशिक येथून या गाड्यांच्या माध्यमातून चेन्नई, मदुराई, कोच्ची आणि गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये कांद्याची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे.

याशिवाय, दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर भागांसाठी 800 टनांपेक्षा जास्त कांद्याची दुसरी खेप पाठवण्यात येत आहे.हा सवलतीचा कांदा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषी पणन महासंघ , नॅशनल कोऑपरेटिव्ह कंज्युमर्स फेडरेशन आणि केंद्रीय भंडार या सरकारी एजन्सींकडे विक्रीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागरिक या संस्थांच्या आऊटलेट्सवरून, ‘भारत ब्रँड’च्या केंद्रांवरून तसेच ठिकठिकाणी फिरणाऱ्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 35 रुपये किलो दराने सहज कांदा खरेदी करू शकतील.

सरकारने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे केवळ सर्वसामान्य ग्राहकांनाच नव्हे, तर व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार असून बाजारातील कांद्याचे दर पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.







