अहिल्यानगर : सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. कळमनुरीहून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या चालत्या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार घडला. रविवारी पहाटे अहिल्यानगर परिसरातून बस जात असताना ही घटना घडल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कळमनुरी येथून बसमध्ये प्रवासासाठी चढली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये चढला. पहाटेच्या सुमारास बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत असताना त्याने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा आरोप आहे.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला आणि बसमधील इतर प्रवासीही हादरले. घटनेची माहिती मिळताच बसमधील दिवे सुरू करण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारत बसमधून खाली उतरवले. घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

पोलिसांनी संबंधित मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, या प्रकरणी महिलेने किंवा अन्य कोणत्याही प्रवाशाने अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांनी त्या व्यक्तीला समज देऊन सोडून दिल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तींना सार्वजनिक बसमध्ये प्रवेश कसा मिळतो, त्यांच्यावर वाहतूक यंत्रणेकडून कोणती तपासणी केली जाते आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, असे प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सतर्क करण्याची मागणी होत आहे.







