पुणे : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारलेली आहेत. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा हा पुरस्कार जाहीर करून सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. देशातील नामवंत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 हा जाहीर करण्यात आला आहे. राम सुतार यांचे वय सध्या 100 वर्ष आहे. त्यांच्या दृष्टीक्षेपात अजून अनेक कलाकृती साकारायच्या आहेत. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात. हुबेहुब, जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंड आहे. त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजही ते शिल्प साकारतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावचे आहेत त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.