लोणी काळभोर, ता. 6 : नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालत आहेत. त्यातच आता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सायबर चोरट्याने एकाला सुमारे पावणे 5 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात घडली आहे.

कदमवाकवस्ती येथील एका 34 वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासोबत कदमवाकवस्ती परिसरात राहतात. फिर्यादी यांना ऐके दिवशी मोबाईलवर लिंक आली. त्या लिंकमध्ये ”वर्क फ्रॉम होम” काम करून खूप पैसे कमवू शकता असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्यानंतर सायबर चोरट्याने दिलेल्या आमिषाला फिर्यादी हे बळी पडले.
दरम्यान, सायबर चोरट्याने टेलिग्राम लिंकव्दारे फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडीवर ऑनलाईन पद्धतीने सुमारे 4 लाख 73 हजार 299 रुपये ट्रान्सफर करुन घेतले. हा प्रकार 23 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्च 2025 या 12 दिवसांच्या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांना कोणतेही काम अथवा त्यांची रक्कम पुन्हा माघारी दिली नाही. त्यामुळे फिर्यादी यांच्या लक्षात आले की आपली ऑनलाईन माध्यमाव्दारे फसवणूक झाली आहे.

त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठुन सायबर चोरट्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 319 (2), 318 (4) आयटीॲक्ट 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत.







