विशाल कदम, लोणी काळभोर

Loni kalbhor : गुटख्याची सुंगधीत तंबाखू विमल गुटखा , बनावट गुटखा तंबाखू तयार करणाऱ्या आर.एम.डी. गुटख्याचा कारखाना उध्वस्त करण्यास अंमली पदार्थ विरोधी पथक 2 च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पाटीलवस्ती परिसरात बनावट आर.एम.डी. गुटख्याच्या कारखान्यावर गुरुवारी (ता.4) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या छाप्यात पोलिसांनी 4 जणांना अटक करून सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय 25, रा काळुबाई मंदिरा जवळ, पत्रावस्ती, थेऊर ता. हवेली जि पुणे) व त्याचे कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय 50 , रा. थेऊर गाव, पुणे मुळ उत्तरप्रदेश), अप्पु सुशिल सोनकर (वय 46, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली जि पुणे मुळ गाव उत्तर प्रदेश) व दानिश मुसाकीन खान (वय 18, रा. कांबळे वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली जि पुणे मुळ गाव उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक 2चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.4) पहाटे गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकाला थेऊर फाट्याच्या जवळ असलेल्या पाटील वस्ती परिसरात बनावट आर.एम.डी. गुटख्याचा कारखाना आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजुस असलेल्या शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल आढळून आला. त्यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, ठंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती आढळून आली. तसेच बनावट गुटखा वाहतुक करण्यात करीता मॉडिफाय करण्यात आलेल्या दोन इनोव्हा कार व नॅक्सोन गाडी व 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, कारखान्याचा मालक रोहित गुप्ता व त्याचे तीन कामगारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274, 275, अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 2006, चे कलम 26 (2) (1) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी सुमित गुप्ता हा फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे.
ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पकंज देशमुख, पोलीस उपाआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी पथक 2चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता बाळासो लाड,पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







