Loni kalbhor : पुणे शहर पोलीस दलातील लोणी काळभोर व वाघोली पोलीस ठाण्याचा हद्दीच्या वादामुळे एका तरुणाच्या मृतदेहाची तब्बल चार तास हेळसांड झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 15) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचा भोंगळ व असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला असून, “कायद्याचे रक्षकच माणुसकी विसरले की काय?” असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.

महावीर बाळासाहेब गुणवरे (वय 33, रा. राजवी पार्क, शिवरोड, केसनंद, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, ते पुणे महापालिकेत खाजगी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास गुणवरे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने शाश्वत हॉस्पिटल येथे दाखल केले.
प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्यांना विश्वराज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र सकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने एमएलसी लोणी काळभोर पोलिसांना दिली. मात्र “ही घटना आमच्या हद्दीत येत नाही,” असे सांगत लोणी काळभोर पोलिसांनी एमएलसी थेट वाघोली पोलिसांकडे पाठवण्यास सांगितले. इथूनच सुरू झाला सरकारी संवेदनशून्यतेचा घृणास्पद खेळ!
नातेवाईक व नागरिकांनी जाब विचारल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर चौकीमधून एक हवालदार पाठवून दिला, आणि तो ताबडतोब रुग्णालयात दाखल झाला. व त्यांनी एमएलसी करण्याचे काम सुरु केले. मात्र वाघोली पोलीस तब्बल चार तास हॉस्पिटलमध्ये फिरकलेच नाहीत. उलट “आणखी 45 मिनिटे लागतील” अशी उत्तरे देत वेळकाढूपणा सुरू राहिला. या काळात मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून होता आणि कुटुंबीय अक्षरशः अश्रू ढाळत उभे होते.
एका तरुणाचा जीव गेल्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा वाद सुरू राहतो, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि अमानवी आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा इतकी निष्क्रिय व असंवेदनशील कशी होऊ शकते, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जर केवळ हद्दीच्या वादामुळे मृतदेहाची पाच तास हेळसांड होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून होत आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीत मृत्यू झाल्यानंतर कोणतेही स्थानिक पोलीस ठाणे तेथे जाऊन पंचनामा करणे, मृतदेह ताब्यात घेणे, शवविच्छेदणासाठी घेऊन जाऊन पुढील कार्यवाही करू शकतो. परंतु, पोलिसांनी का केले नाही ते चेक करते?
अनुराधा उदमले (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)







