Kolhapur : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका अगदी दारात आल्या आहेत. सगळीकडे प्रचाराचा जोर वाढलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचायचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतोय. पण याच वातावरणात कोल्हापूरमध्ये काही विचित्र, भानामतीसदृश प्रकार सुरू झालेत. कागल तालुक्यातल्या मुरगुड शहरात तर एक थेट उमेदवाराच्या घरासमोरच असा प्रकार करून भीती पसरवायचा प्रयत्न झालाय. Kolhapur

शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला. मुरगुडच्या प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे यांच्या घराबाहेर पत्रावळीत नारळ, ५-६ लिंबू, अंगारा, हळद-कुंकू, फुले असं सामान ठेवलेलं सापडलं. आणि लिंबूंना टाचण्या खुपसलेल्या पाहून हा प्रकार भानामतीचा असल्याचं स्पष्ट झालं. रात्री उशिरा किंवा पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात लोकांनी हे कृत्य केल्याची माहिती मिळतेय. दोन दिवस आधीच हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत तेथे मोठी सभा झाली होती, त्यामुळे हा प्रकार राजकीय हेतूनेच झाल्याची चर्चा रंगलीये.
शहराच्या मध्यभागी हा प्रकार घडल्याने मोर्चे कुटुंबासह परिसरातील लोक घाबरलेत आणि सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भानामतीचे प्रकार वाढले!
एकाच घटनेवर थांबत नाहीये प्रकरण. मतदानयंत्रे ठेवायच्या स्ट्राँग रूमसमोरही टाचण्या खुपसलेले लिंबू फेकण्यात आल्याचं समोर आलंय. इतकंच नाही, तर एका दुसऱ्या उमेदवाराच्या घरासमोर काळा गोफ बांधून गाठी टाकलेल्या अवस्थेत सापडला. या सगळ्या गोष्टींमुळे निवडणूक वातावरण तापलं असून, “लोकशाहीवर हल्ला सुरू आहे” असा आरोप लोक करतायत.
तीव्र निषेध आणि संताप
अमृता मोर्चे यांचे पती गौरव मोर्चे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “असं भितीचं वातावरण निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना शोधून काढून कडक कारवाई झाली पाहिजे.” राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही हा प्रकार उघडपणे निषेधला असून, सभा आणि सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातोय.
सीसीटीव्ही तपास सुरू
मुरगुड पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलंय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय आणि आरोपी कॅमेऱ्यात कैद झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. इतर ठिकाणी घडलेल्या भानामतीच्या घटनांचाही तपास सुरू आहे. 2 डिसेंबरला मतदान असल्याने पोलीस सध्या अधिक सतर्क झालेत.
या सगळ्या घटनांमुळे मुरगुड नगरपरिषद निवडणूक चांगलीच चर्चेत आलीये. 20 जागांसाठी राष्ट्रवादी, महायुती आणि शाहू आघाडी यांच्यात तुफानी लढत पाहायला मिळतेय.







