दिल्ली : नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जिवाला धोका असल्याचे गोपनीय अहवालात नमूद करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सध्या ज्ञानेश कुमार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आलेली असून, त्यांच्या निवासस्थानासह निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी अत्यंत तापल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच डाव्या पक्षांनी जंतरमंतर आणि इतर ठिकाणी आक्रमक निदर्शने सुरू केली आहेत. या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांची नासधूस करणे व इतर मार्गांनी मार्ग रोखण्याचे प्रयत्न केल्यामुळे पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

विरोधकांच्या या वाढत्या विरोधामुळे आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेल्या मोठ्या आंदोलनामुळे राजधानीत तणावाचे वातावरण आहे. कॉकरोच जनता पार्टीनेही जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा दिला असून, परवानगी न मिळाल्यास आहे तिथेच आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय व स्थानिक पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व यंत्रणा एकमेकांच्या समन्वयाने काम करत असून संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.







