सागर जगदाळे

भिगवण : येथील भैरवनाथ विद्यालयातील एका वर्गखोलीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून जवळपास एक महिना उलटत आला आहे. या घटनेनंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली असली तरी अद्याप आवश्यक डागडुजीचे काम सुरू झालेले नाही. दरम्यान, संबंधित वर्गखोलीतच विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्गखोलीच्या छताचा काही भाग खराब झालेला असून स्लॅबला तडे गेलेले, तसेच प्लास्टर उखडलेले दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅबचा एक भाग अचानक खाली पडल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, छताचा उर्वरित कमकुवत भाग भविष्यात अचानक कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

विद्यार्थी वर्गखोलीत बसून शिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यावरच धोकादायक अवस्थेतील स्लॅब असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित वर्गखोलीची तांत्रिक तपासणी करून आवश्यक डागडुजी होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. स्लॅबसह इमारतीतील इतरही डागडुजीची कामे बाकी असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची बाब असल्याने पाहणीपुरती कार्यवाही न राहता, तांत्रिक अहवालाच्या आधारे आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही, याबाबत प्रशासन व संस्थेने स्पष्टता देण्याची मागणीही होत आहे.
“पाहणी झाली आहे; अहवालाची प्रतीक्षा”
“संस्थेचे पदाधिकारी इमारतीची पाहणी करून गेले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. स्लॅबसह इतरही डागडुजीची कामे करणे बाकी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल.”
— खराटे डी. डी., मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय, भिगवण







