Indigo Airlines : इंडिगो एअरलाईन्सची मोठा गोंधळ सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी क्रूची कमतरता भेडसावत असल्यामुळे आज (गुरुवार) पुन्हा अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू अशा मोठ्या विमानतळांवर तर स्थिती अक्षरशः रेल्वे स्टेशनसारखी झाली. दिवसभरात 200 च्या आसपास फ्लाइट रद्द झाल्यामुळे लेकराबाळांना घेऊन प्रवाशांना विमानतळावरच अडकून बसण्याची वेळ आली. (Indigo Airlines)

रात्रभर विमानतळावर अडकलेले प्रवासी
आज सकाळी फक्त दिल्लीहूनच 30 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली. रात्रीपासूनच प्रवाशांच्या रांगा तशाच लागलेल्या होत्या. अनेकांनी तर रात्रीचं जागरण करून फ्लाइट सुरू होईल या आशेवर विमानतळावर थांबावं लागलं. हैदराबादमध्येही जवळपास 33 उड्डाणे रद्द झाली. आज देशभरात एकूण 170 पेक्षा जास्त फ्लाइट रद्द होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते.
मंगळवार-बुधवारीही जवळपास 200 उड्डाणे रद्द झाली होती. बेंगळुरू 42, दिल्ली 38, मुंबई 33, हैदराबाद 19, अहमदाबाद 25, इंदूर 11, कोलकाता 10, सूरत 8. शेकडो उड्डाणांना तासन्तास विलंब झाला. त्यामुळे हजारो प्रवासी अक्षरशः अडकून पडले.
इंडिगो दररोज साधारण 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स चालवते. कंपनीने प्रवाशांची माफी मागून सांगितलं की शुक्रवारपर्यंत अजून थोड्या फ्लाइट रद्द होऊ शकतात.
इंडिगोचं म्हणणं – “५ डिसेंबरपर्यंत सगळं व्यवस्थित होईल”
कंपनीच्या निवेदनानुसार, छोट्या-छोट्या टेक्निकल समस्या, हिवाळी वेळापत्रकातील बदल, खराब हवामान, एअर ट्रॅफिकचं मंद नेटवर्क आणि क्रूच्या ड्युटी टाइमशी संबंधित नवीन नियम या सगळ्याचा एकत्रित परिणाम ऑपरेशन्सवर झाला आहे. हे आधीच अंदाजात नव्हतं, असा इंडिगोचा दावा. पुढील 48 तासांत परिस्थिती स्थिर होईल, असंही त्यांनी सांगितलं.
Need to shutdown Indigo airlines. Really pathetic from 13hrs I am waiting in Mumbai airport. My flight is at 9:30PM on 3rd dec 2025. Waiting since 13hrs no response and no service providing. @IndiGo6E @DGCAIndia @narendramodi pic.twitter.com/aNpZ4tldmm
— King (@sarathBabu8081) December 4, 2025
डीजीसीएचा इंडिगोला समन्स
दरम्यान, डीजीसीएने इंडिगोला नोटीस पाठवून संपूर्ण परिस्थितीचं कारण आणि उपाययोजना विचारल्या आहेत. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, सध्या क्रूची कमतरता हे मुख्य कारण आहे. गेल्या महिन्यापासून ही अडचण सुरू आहे. फक्त नोव्हेंबरमध्येच 1,232 फ्लाइट रद्द झाल्या आणि मंगळवारी तब्बल 1,400 उड्डाणांना विलंब झाला.







