पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News) शहरात परवानगी न घेता झाडे तोडणाऱ्यांवर पालिकेने तब्बल 50 हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद लागू केली आहे. शहरात झाडांची संख्या कमी होऊ नये यासाठी PCMC ने हे मोठे पाऊल उचलले आहे. छुप्या पद्धतीने झाडतोड होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या असून वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने (PCMC) आता कठोर धोरण स्वीकारले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक आणि भूखंड मालक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

नागरिकांनी घराच्या आवारातील किंवा प्लॉटवरील झाड तोडण्यापूर्वी पालिकेची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.
या नियमानुसार, कोणत्याही नागरिकाला झाड तोडण्यापूर्वी त्याचा सविस्तर अहवाल आणि झाड तोडण्याचे स्पष्ट कारण नमूद करून, संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे विधिवत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. पर्यावरण जपण्याची आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, या उद्देशानेच हे कडक नियम लागू करणे PCMC प्रशासनाला महत्त्वाचे वाटत आहे.







