आदित्य बोराटे –

इंदापूर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी (ता. 25) होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी 100 फुटी रोडवरील नवीन नगरपरिषद कार्यालयासमोरील प्रांगणात सहा कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी नदी-नाल्यांऐवजी या कृत्रिम कुंडांचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा व मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे तसेच विजेच्या तारांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.

विसर्जनाची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आठ नियंत्रण अधिकाऱ्यांसह 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात येणार आहे.
आरती घरीच करून येण्याचे आवाहन
विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये आणि भाविकांचा वेळ वाचावा, यासाठी विसर्जनस्थळी होणारी आरती शक्यतो घरीच करून येण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कमीत कमी वेळ थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य
नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम जलकुंडातच करावे. तसेच फटाकेमुक्त व प्रदूषणविरहित विसर्जनाला प्राधान्य देत निर्माल्य कुंडाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदी, नाले व जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“गणेश विसर्जनाचा उत्सव भक्तिभावाने साजरा करताना पर्यावरणाचे भान आणि प्रशासनाला सहकार्य हीच खरी गणेशभक्ती,” या भावनेतून नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.






