लोणी काळभोर : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच पूर्व हवेलीतील ग्रामीण राजकारणाला चांगलेच उधाण आले आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी गावोगावी प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले असून, “उमेदवारी मिळो वा न मिळो” या भूमिकेतून ताकद दाखवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. चारपैकी दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांनी या गटांकडे लक्ष केंद्रीत केले असून, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

पूर्व हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ व उरुळी कांचन असे चार गट आहेत. तर पंचायत समितीचे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, आव्हाळवाडी, कोरेगाव मूळ, केसनंद, उरुळी कांचन व सोरतापवाडी असे आठ गण आहेत. निवडणूक प्रक्रियेला गती मिळताच चारही गटांत उमेदवारीसाठीची चुरस वाढली असून, इच्छुकांच्या वाढत्या सक्रियतेमुळे पक्षांतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे अनेक गट व गणांत प्रभावी उमेदवार असल्याने महायुतीत या पक्षाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. मजबूत बुथ स्तरीय संघटन आणि शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांचा मतदारसंघ असल्याने भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर माजी आमदार अशोक पवार यांच्यासाठी ही लढत ‘अस्तित्वाची’ मानली जात आहे. एकूणच, निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील ग्रामीण राजकारण तापले असून, लढत काट्याची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
थेऊर गट ओबीसीसाठी राखीव तर कोरेगाव मूळ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला असल्याने या दोन्ही ठिकाणी प्रस्थापित नेते थेट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पूर्व हवेली भागात राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे वर्चस्व असले तरी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिंदेसेना व उद्धवसेनेचीही काही भागांत ताकद आहे, तर काँग्रेस अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील युतीचा पॅटर्न ग्रामीण निवडणुकीतही राबविला जाण्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेसाठी थेऊर गटातून आरोग्यदूत युवराज काकडे यांच्या पत्नी पल्लवी काकडे, उद्योजक संदेश आव्हाळे यांच्या पत्नी कोमल आव्हाळे, तर कोरेगाव मूळ गटातून सुरेखा हरगुडे इच्छुक आहेत. लोणी काळभोर गटातून शीतल कांबळे, अनिता गवळी, तर उरुळी कांचन गटातून जितेंद्र बडेकर, जीवन शिंदे, शंकर बडेकर आदींची नावे चर्चेत आहेत.
पंचायत समितीच्या थेऊर व कोरेगाव मूळ गणांतही मोठी चुरस असून, इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. थेऊर गणातून सिद्धांत सचिन तुपे, संग्राम मच्छिंद्र कोतवाल, योगेश दत्तात्रय काकडे, तर कोरेगाव मूळ गणातून उद्योजक कृषिराज ऊर्फ मनोज दत्तात्रय चौधरी, पेठचे माजी सरपंच सूरज चौधरी आणि माजी सरपंच मंगेश कानकाटे इच्छुक आहेत. उरुळी कांचन गणातून सारिका लोणारी, सुषमा चव्हाण, कोमल कांबळे, तर सोरतापवाडी गणातून भाजपचे नेते सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे जिल्हा युवकाध्यक्ष व शिंदवणेचे माजी सरपंच अण्णा महाडिक, भाजपच्या पूजा सणस, काका कुंजीर यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, वाडेबोल्हाई गणातून वंचित बहुजन आघाडीकडून दिपाली केतन निकाळजे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा एल्गार पुकारत त्यांनी विकासकामांचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि निवडणुकीपुरता होणारा खर्च या मुद्द्यांवर थेट जनतेत उतरून प्रचार सुरू केला आहे. “निवडणूक मटण-भाकरीवर नव्हे, तर पोराबाळांच्या भविष्यावर लढायची आहे,” असा ठाम संदेश देत त्यांनी महिला व तरुणांचा लक्षणीय पाठिंबा मिळविला आहे.







