सातारा : कराडजवळील मलकापूर येथे उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन घडलेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ढेबेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला असून उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढण्यात बचावकार्याला यश आले आहे.

मलकापुरातील ढेबेवाडी फाटा परिसरात उसाची वाहतूक करणारी एक ट्रॅक्टर-ट्रॉली अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटली. ट्रॉली पलटी झाल्याने उसाचा मोठा ढिगारा रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी तेथून जाणाऱ्या दोन दुचाकी उसाच्या ढिगाऱ्याखाली आणि ट्रॉलीखाली दाबल्या गेल्या. प्राथमिक माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि कराड वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखालून पाटण तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उसाचा प्रचंड भार अंगावर पडल्यामुळे मालन मोहन सुतार (वय 60, रा. काढणे, ता. पाटण) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा यशवंत मोहन सुतार (वय 28) हा या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात गंभीर दुखापत झालेल्या यशवंत सुतार यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उसाच्या ढिगाऱ्याखाली किंवा ट्रॉलीखाली आणखी काही व्यक्ती अथवा वाहने अडकली आहेत का, याचा शोध पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून घेतला जात आहे.

या अपघाताची बातमी समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आईचा अशा दुर्दैवी अपघातात झालेला मृत्यू पाहून काढणे गाव आणि मलकापूर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी कराड वाहतूक पोलीस अधिक तपास करत आहेत.






