पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी पुण्यातील महिला जागर समिती आक्रमक झाली असून बस स्थानकात आरोपीची तिरडी हातात घेत अनोखं आंदोलन करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. यावेळी नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे. इतकेच नाही तर आंदोलनकर्त्या महिलांनी गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. या तिरडी आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी महायुती सरकारचा देखील निषेध व्यक्त केला आहे.
स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला शुक्रवारी 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र आता त्याला फाशी देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. याप्रकरणी आज स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आलं.महिला सुरक्षेच्या अनुषंगाने हातात तिरडी घेत आक्रमक होत आंदोलक महिलांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याला फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीने या आंदोलनात जोर धरला.
स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. त्यातच मागील काही वर्षाची पुण्यातील महिला अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मागच्या 40 दिवसात अशा 56 घटना शहरात घडल्याची नोंद आहे. त्यामुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.