मुंबई: सोन्याच्या (Gold Rate Today) दराबद्दल एक महत्त्वपूर्ण अंदाज समोर आला आहे. अमेरिकेतील बदललेले कर धोरण आणि विविध देशांतील भू-राजकीय समस्यांमुळे पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये सोने सध्याच्या किमतीपेक्षा 15 ते 30 टक्क्यांनी अधिक महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले आर्थिक अस्थिरतेचे वातावरण या दरवाढीस कारणीभूत ठरणार आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 53 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असून आणखी दर वाढ होणार असल्याचे एका जागतिक अहवालातून समोर आले आहे.

घटलेले उत्पन्न, वाढता तणाव आणि सुरक्षित पर्यायाची मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्यासाठी शक्यता अधिक दाट आहे. माहितीनुसार, गुंतवणुकीत स्थिरता आणण्यासाठी आणि विविधता जपण्यासाठी मध्यवर्ती बँका तसेच मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्याचा साठा वाढवला आहे. 2025 मध्ये जागतिक गोल्ड ईटीएफमध्ये 77 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून, त्यांची सोन्यातील होल्डिंग 700 टनांहून अधिक आहे. 2026 मध्ये सोन्याच्या किमती 5 ते 20 टक्क्यांच्या रेंजमध्ये कमी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत असून भू-राजकीय बदलामुळे नेमकं काय होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज 5 डिसेंबर रोजी बाजारातील सोन्या-चांदीचे भाव पाहता, 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 12,965 असा दर आहे. चांदीचा भाव देखील प्रति किलोग्रॅम 1,90,900 पर्यंत गेला आहे.







