पुणे: सध्या जागतिक पातळीवर होत असलेले बदल आणि अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाल्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमती आज काहीशा खाली आल्या आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव ०.१५ टक्क्यांनी घसरून १,५९,३६८ रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा दर प्रति किलो २,७४,०३६ रुपये झाला आहे. मुंबई आणि पुण्याबद्दल बोलायचे झाले, तर आज येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १,५९,९४० रुपये, तर २२ कॅरेटसाठी १,४६,६१० रुपये आहे. दिल्लीत ग्राहकांना याच सोन्यासाठी अनुक्रमे १,६०,०९० आणि १,४६,७६० रुपये मोजावे लागत आहेत.
जागतिक बाजारात सध्या सोन्याचा भाव (स्पॉट गोल्ड) ०.४ टक्क्यांनी घसरून $४,५२२.८९ प्रति औंसवर आला आहे. दुसरीकडे, इराणसोबतच्या चर्चेत सकारात्मक प्रगती होत असल्याचे संकेत मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव थोडा कमी झाला आहे. मात्र, कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने महागाईची भीती कायम आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या आयातीवरील शुल्क थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. तसेच, चांदीच्या विटांच्या आयात नियमांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्याचाही परिणाम दरात पाहायला मिळत आहे.







