अमित मुंडीक
पुणे : उंड्री, जगदंब भवन मार्ग येथील मार्वल आयडियल सोसायटी या चौदा मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये आगीची घटना (Fire Incident) घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने पाच अग्निशमन वाहने, एक बी ए सेट व्हॅन, दोन टँकर, एक उंच शिडीचे वाहन आणि शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
घटनास्थळी दाखल होताच आगीचे रौद्र रुप व धुर पाहताच जवानांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. यावेळी या आगीत कोणी अडकले आहे का? याची तपासणी करत असताना अचानक स्वयंपाक घरातील दोन सिलेंडरचा स्फोट झाला. ज्यात 3 स्थानिक व अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले आहेत.
आग विझवत घरात प्रवेश केला तेव्हा एका मुलाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाभरात आग इतरत्र पसरु न देता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली आहे. दुर्दैवाने या आगीत एका पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ही आग कशी लागली? याचे कारण समजू शकलेले नाही. याचा तपास सुरु असताना या इमारतीमधील स्थायी अग्निशमन यंत्रणा प्राथमिक स्तरावर बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले असून, अग्निशमन प्रमुखांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, इमारती मधील अग्निशमन यंत्रणा आपल्या स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी असून, शहरातील सर्व इमारतींनी अग्निशमन यंत्रणा योग्य चालू स्थितीत राहील याची स्वतः काळजी घ्यावी.







